बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षातील शासकीय अनुदानांतर्गत सुमारे १.८३ कोटी रुपयांची कृषी यंत्रसामग्री आणि सूक्ष्म सिंचन संच वितरित करण्यात आले.


येथील गृह कार्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते ३२१ लाभार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत १६१ लाभार्थ्यांना १.१६ कोटी रुपयांची यंत्रसामग्री, तर सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत १६० लाभार्थ्यांना ६७.०४ लाख रुपयांचे ठिबक व तुषार सिंचन संच देण्यात आले.


या वेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतकरी समृद्ध झाला तरच राज्य प्रगत होईल. पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते वेळेत पुरवण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच अवकाळी पाऊस किंवा दुष्काळाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी ३ एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्रीच्या भाड्यावर ५० टक्के अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला कृषी विभागाचे उपसंचालक सलीम संगत्रास, साहाय्यक कृषी संचालक मंगळा बिरादार, काडा अध्यक्ष युवराज कदम, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बाळू देसूरकर, मनोहर बेळगावकर यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments