मुलांच्या साहित्य आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक बाल विकास अकादमीतर्फे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेळगावात तीन दिवसीय राज्यस्तरीय ‘कर्नाटक बाल साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष अडिवेश इटगी यांनी दिली.

जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या पूर्वतयारी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाजीनगर येथील कार्यालयात झालेल्या या बैठकीला बेळगाव व धारवाडचे जिल्हाधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी आणि अकादमीचे सदस्य उपस्थित होते. पावसाळा संपल्याने हे संमेलन शहरातील सीपीएड मैदानावर होणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात बालकांचा सर्वांगीण विकास, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक खेळांवर विशेष भर दिला जाईल. राज्यातील चारही विभागांतून दररोज १० ते १५ हजार विद्यार्थी यात सहभागी होण्याचा अंदाज आहे. उपस्थित बालकांसाठी निवास व भोजनाची सोय केली जाणार आहे. साहित्य क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार, बालप्रतिभांचे सादरीकरण, पुरस्कार वितरण तसेच ‘बाल बांधव्य’ व पालकांशी संवाद असे विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत.


Recent Comments