कित्तूर तालुक्यातील अवरादी गावात संपत्तीच्या वादातून एका माजी सैनिकाची आणि त्यांच्या तरुण मुलीची ग्रामपंचायत कार्यालयातच कुऱ्हाड व विळ्याने भोसकून हत्या करण्यात आली.


रुद्रप्पा कुंदरगी (वय ६७, रा. सत्तूर, धारवाड) आणि त्यांची मुलगी शशिकला कुंदरगी (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. रुद्रप्पा यांनी जमिनीच्या वादाबाबत न्यायालयातून निकाल मिळवला होता. या निकालाच्या आधारे ग्रामपंचायत कार्यालयात कागदपत्रांची दुरुस्ती करण्यासाठी ते मुलीसह आले होते.

त्याच वेळी पूर्ववैमनस्यातून रुद्रप्पा यांचे भाऊ बसप्पा कुंदरगी, संगप्पा कुंदरगी आणि पुतण्या मडीवाळप्पा कुंदरगी यांनी पंचायत कार्यालयात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात रुद्रप्पा यांचा जागीच मृत्यू झाला, तर वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या शशिकला यांचाही मृत्यू झाला.
हल्ला रोखण्याचा प्रयत्न करणारा कार चालक राहुल हादेखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी कित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपींना आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


Recent Comments