Belagavi

पिण्याच्या पाण्यासाठी जूनपर्यंत काळजी नको : पालकमंत्री

Share

बेळगावात आयोजित केडीपी (KDP) बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, शेती आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. जलाशयातील उपलब्ध साठा पाहता येत्या जून महिन्यापर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सौंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगल तसेच सोयाबीन उत्पादक प्रमुख भाग दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पातळीवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आमदारांच्या तक्रारीची दखल घेत शहरातील खड्डेमय रस्ते दुरुस्तीला प्राधान्य दिले जाईल. तसेच ‘अमृत’ योजनेअंतर्गत वारंवार तीच कामे करून सरकारी निधीचा अपव्यय करू नये, असा इशारा त्यांनी दिला.

वॅक्सिन डेपो परिसरात कोणतीही ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) न घेता उभारण्यात आलेल्या ‘व्हिलेज ऑफ कल्चर’बाबत मंत्री जारकीहोळी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. नियमांचे उल्लंघन करून परवानगीशिवाय काम केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून लोकायुक्तांकडेही ही बाब मांडण्यात आली आहे. संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: