Belagavi

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या जनसेवेनिमित्त बेळगावात भाजपचे सेवा उपक्रम

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजप उत्तर मंडळाचे माजी कार्याध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महिनाभरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव येथील गणपती मंदिरात विशेष पूजा आणि गोपूजा केली जाणार आहे. त्यानंतर बिम्स रुग्णालयातील प्रसूती विभागात रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे.

महिनाभराच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अनाथ बालकांसोबत सहभोजन, गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग आणि केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची घरोघरी जाऊन माहिती देणे असे उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा वृत्ती आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी खो-खो, कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. सर्व उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

Tags: