बेळगावातील बॉक्साईट रोडवरील नवीन जनावरांच्या बाजारात सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी आणि व्यापारी पुन्हा जुन्या एपीएमसी बाजारात परतले आहेत.

बॉक्साईट रोडवर लाखो रुपये खर्चून नवीन बाजार तयार करण्यात आला होता. मात्र, तेथे वाहनांच्या पार्किंगची जागा, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत होते. त्यामुळे त्यांनी नवीन बाजार सोडून जुन्या एपीएमसी बाजारातच खरेदी-विक्री सुरू केली आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून एचएफ, गिर, मुऱ्हा, जर्सी व पंढरपुरी जनावरे विक्रीसाठी दर शनिवारी बेळगावात येतात. बायलहाँगल, संकेश्वर, यरगट्टी, धारवाड आणि हुबळी येथून येणाऱ्या व्यापाऱ्यांना जुन्या बाजारात पावसाळ्यात चिखल आणि पार्किंगचा त्रास होत होता. तरीही नवीन बाजारात सोयी नसल्याने व्यापाऱ्यांना पुन्हा जुन्या बाजारात यावे लागले आहे.

नवीन बाजारात पार्किंग, पाणी आणि जनावरांच्या सुरक्षेची सोय करण्याची मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने या सुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Recent Comments