Khanapur

नंदगडमध्ये नव्याने तयार केलेला रस्ता उध्वस्त

Share

खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड येथील गवळीवाडा रस्त्याच्या विकासासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच रस्ता उध्वस्त झाल्याने शाळकरी मुले आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

आमदार विठ्ठल हलगेकर यांनी नंदगड येथील गवळीवाडा भागातील नागरिक व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मोठ्या उत्साहात या रस्त्याच्या कामाचा प्रारंभही करण्यात आला होता.

मात्र, संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे लहान मुलांना शाळेत जाताना कसरत करावी लागत असून, आधीचाच रस्ता यापेक्षा बरा होता अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

या २५ लाखांच्या कामाची तांत्रिक मंजुरी देणारे अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी न करताच फाईल कशी मंजूर केली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अल्ताफ बसरीकट्टी, इन न्यूज, नंदगड

Tags: