कडोली येथील सर्व्हे क्रमांक ५६४ ची जमीन कोणत्याही खासगी किंवा सार्वजनिक संस्थेला देऊ नये, या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निदर्शने केली.

ही जमीन गावच्या मोकळ्या जागेसाठी, खेळाच्या मैदानासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी आरक्षित ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. बेळगाव तालुक्यातील कडोली येथील या सर्व्हे क्रमांकात एकूण ३३ एकर १६ गुंठे जमीन असून, ती गावचे गोठाण, मैदान, सण-उत्सव आणि जलसंरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या जमिनीचा वापर अन्य प्रकल्पासाठी करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी हा विरोध दर्शवला.

ग्रामपंचायतीने कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला या जमिनीसाठी ना हरकत दाखला न देण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. या संदर्भात ग्रामस्थांनी कडोली ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्याला ११ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत निवेदन दिले. आगामी ग्रामसभेत याबाबत ठराव मंजूर करून ही जमीन गावच्या वापरासाठीच सुरक्षित राहील, असा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी ग्रामस्थांशी चर्चा न करता तलाठ्याची बदली केल्याबद्दल संताप व्यक्त केला. ग्रामस्थांना आणि लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून कोणताही निर्णय घेतल्यास तो सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments