जगातील सर्वात कमी उंचीच्या नागपूर येथील ज्योती आमगे यांनी गुरुवारी बेळगाव महानगरपालिकेला अचानक भेट दिली. या वेळी या विशेष पाहुणीला पाहून पालिका अधिकारी आणि नागरिक आश्चर्यचकित झाले.


३२ वर्षांच्या ज्योती आमगे यांची उंची २ फूट ०.७ इंच असून वजन ५ किलो आहे. जगातील सर्वात कमी उंचीच्या महिला म्हणून त्यांच्या नावावर ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदवला गेला आहे. आतापर्यंत केवळ टीव्ही आणि रियॅलिटी शोमधून दिसणाऱ्या ज्योती यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी बेळगावकरांना मिळाली.

एका खाजगी शोरूमच्या उद्घाटनासाठी बेळगावात आलेल्या ज्योती यांनी महानगरपालिकेला भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालिका आयुक्त एम. कार्तिक आणि महापौर प्रीती कामकर यांची भेट घेऊन त्यांनी काही वेळ चर्चा केली.
या वेळी बोलताना महापौर प्रीती कामकर यांनी ज्योती यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ज्योती यांची शारीरिक उंची कमी असली तरी त्यांच्या कामगिरीने त्यांना जगभरात ओळख मिळवून दिली असल्याचे सांगत महापौरांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
आपण पहिल्यांदाच बेळगाव शहरात आलो असून येथील सुंदर शहर पाहणे आणि प्रेमळ लोकांना भेटणे हा उत्तम अनुभव असल्याचे ज्योती आमगे यांनी सांगितले. शोरूम उद्घाटनासाठी आले असताना पालिका प्रशासनाला भेट देण्याची इच्छा होती. पालिकेतील सर्वांनी प्रेमाने स्वागत करून फोटो काढल्याचे सांगत त्यांनी बेळगावकरांच्या आदरातिथ्याबद्दल समाधान व्यक्त केले.
ज्योती आमगे यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. कोणत्याही प्रवासात कुटुंब त्यांच्यासोबत असते. एक विशेष व्यक्तिमत्त्व पालिकेत आल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


Recent Comments