विजापूर-आलमट्टी राष्ट्रीय महामार्गावरील गोळसंगी गावाजवळ कॅनरा बँकेचे एटीएम फोडून १९.२९ लाख रुपये लुटल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.


२ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमचे शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर एटीएम मशिनचे सेफ बॉक्स कापून त्यातील १९.२९ लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला होता. कॅनरा बँकेचे व्यवस्थापक शरणप्पा यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चार तपास पथके तयार करण्यात आली होती.


तपासादरम्यान परिसरातील व महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी मध्य प्रदेशच्या दिशेने गेल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील कानवन पोलिसांनी दिल्ली-मुंबई महामार्गावर स्कॉर्पिओ अडवून आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर विजापूर पोलिसांनी तेथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिघांना अटक केली.
साहिल (वय २४, रा. पलवल, हरियाणा), कमरियाब (वय ५०, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) आणि आकाश (वय २७, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथील एकूण सहा जणांनी मिळून हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे आरोपी अट्टल चोरटे असून गुगल मॅपच्या साहाय्याने राष्ट्रीय महामार्गावरील एटीएम शोधून चोरी करत असत.
आरोपींकडून ३.६० लाख रुपयांची रोकड, एमएच-१२-एक्सएच-५११२ क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी, स्क्रू ड्रायव्हर आणि गॅस कटर जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील उर्वरित तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.


Recent Comments