Belagavi

बेळगावात ४१ वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा

Share

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त कॉर्निया अंधत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावात वॉकथॉनचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, जिल्हा अंधत्व नियंत्रण विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, लायन्स इंटरनॅशनल, रोटरी क्लब, बेळगाव नेत्रचिकित्सक संघ, एम. एम. जोशी कोडकणी नेत्र केंद्र आणि एसजीएम आय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

ही वॉकथॉन रॅली सकाळी राणी चन्नम्मा चौकातून सुरू होऊन अयोध्या नगर येथील एम. एम. जोशी कोडकणी नेत्र केंद्राजवळ समाप्त झाली. या रॅलीत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवक, नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करून दृष्टीचे दान द्यावे, असे आवाहन करणारे बॅनर्स आणि घोषणा देत सहभागींनी पदयात्रा काढली.

वाढत्या अंधत्वावर मात करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने पुढे येऊन नेत्रदान करावे, असे आवाहन डीएलओ तथा कार्यक्रम अधिकारी डॉ. गीता कांबळे यांनी केले.

एम. एम. जोशी कोडकणी नेत्र केंद्राच्या वैद्यकीय संचालिका डॉ. शिल्पा कोडकणी यांनी ध्वजारोहण करून रॅलीचा प्रारंभ केला. नेत्रदान हे अत्यंत मूल्यवान असून प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करणे आजच्या काळात गरजेचे आहे. पूर्वीप्रमाणे दोन डोळ्यांच्या दानातून केवळ एका व्यक्तीलाच फायदा न होता, आता चार जणांना दृष्टी मिळू शकते. याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी नेत्रदान जनजागृती पंधरवडा आयोजित केला जातो, अशी प्रतिक्रिया डॉ. शिल्पा कोडकणी यांनी दिली.

यावेळी उपस्थित अन्य डॉक्टरांनीही उपस्थितांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले.

या उपक्रमात अल इक्रा फाउंडेशन, श्री गुरु संस्था, लेकव्ह्यू नर्सिंग कॉलेज, ए. एम. शेख होमिओपॅथी कॉलेज, एक्सपर्ट पीयू कॉलेज, मराठा मंडळ पदवी महाविद्यालय आणि महावीर मिरजी पदवी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: