Belagavi

कर्नाटक राज्य बंजारा साहित्य परिषदेच्या बेळगाव जिल्हा शाखेचे उद्घाटन

Share

बंजारा भाषेसह संस्कृती, संगीत आणि चालीरीतींचे जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी बेळगावात कर्नाटक बंजारा साहित्य परिषदेची स्थापना होणे ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन बेळगाव ग्रामीणचे गटशिक्षणाधिकारी पुंडलिक चव्हाण यांनी केले.

अयोध्या नगर येथील बी. डी. जत्ती कॉलेजमध्ये नगारा वाजवून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना परिषदेचे जिल्हाध्यक्ष बी. पी. लामाणी यांनी भाषेच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

संस्थेचे प्रदेशाध्यक्ष कांत आर. जाधव यांनी बंजारा समाजाचे मौखिक साहित्य, संगीत आणि भरतकाम कला जतन करण्याचे काम परिषद करेल असे स्पष्ट केले. तर न्यायालयाचे व्यवस्थापक सुरेश राठोड यांनी प्रत्येकाने घरात मुलांशी बंजारा भाषेत संवाद साधावा, असा सल्ला दिला.

कार्यक्रमाला प्रा. नारायण राठोड, बी. एल. चव्हाण, गंगाधर पम्मार यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. मुधोळ येथील राजलक्ष्मी पम्मार यांच्या कलापथकाने बंजारा पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Tags: