मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याची मानसिकता पालकांनी विकसित केली पाहिजे. मातृभाषेमुळेच आपली संस्कृती टिकून राहू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते व गांधीवादी विचारवंत शिवाजीराव कागणिकर यांनी केले.


बेळगाव शहरातील भडकल गल्ली येथील श्री बनशंकरी मंदिर सभागृहात आयोजित गुरु विवेकानंद विविधोद्देशीय सहकारी संस्थेच्या १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.


देशात विविध भाषा आणि संस्कृती असल्या तरी मातृभाषेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. सध्या इंग्रजी भाषेचे आकर्षण वाढल्याने मातृभाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस उपआयुक्त (डीसीपी) नारायण बारामणी म्हणाले की, यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे. मोबाईलचा वापर योग्य कारणासाठीच केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायण नाईक यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या १४ वर्षांच्या पारदर्शक कारभाराची माहिती दिली. कार्यक्रमात सभासदांच्या ३५ गुणवंत पाल्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आनंद राव, संचालक राजेश गौडा, भारती शेट्टिगार, सतीश मन्निकेरी, आनंद शेट्टी, गणेश मरकल, रूपा मगदूम, गणेश नायक, चंद्रकांत अथणीमठ, दुर्गप्पा तळवार, तसेच सचिव विशाल पाटील यांच्यासह सर्व संचालक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.


Recent Comments