राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी सोमवारी बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या महिला व रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.



भेटीदरम्यान लैंगिक अल्पसंख्याक हक्क आंदोलनाच्या प्रतिनिधींनी जिल्हा रुग्णालयातील गैरसोयी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय त्रुटी दूर करण्याची मागणी करणारे निवेदन अध्यक्षांना दिले. प्रसुती कक्षातील महिलांसाठी स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि गरोदर महिलांची विविध तपासण्यांसाठी होणारी पळापळ यांवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ही समस्या अत्यंत गंभीर असून पुढील दोन दिवसांत यावर तोडगा काढण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


रुग्णालयात येणाऱ्या महिला रुग्णांना सुरक्षित व सन्मानजनक वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारी विभागात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना धमकावणे किंवा त्यांचा छळ करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. अशा प्रकरणात पीडित महिला अधिकारी थेट पोलिसांत तक्रार दाखल करू शकतात आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.



Recent Comments