बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावात कामादरम्यान मिळालेली सोन्याची नाणी कामगारांनी प्रशासनाकडे सुपूर्द केली आहेत. या कामगारांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंचल गावातील शासकीय वसतिगृहाजवळ सुरू असलेल्या कामात माती उकरताना कामगारांना एका मडक्यात १४ सोन्याची नाणी सापडली. सुमारे ५४.८ ग्रॅम वजनाची आणि आठ लाख रुपयांहून अधिक मूल्याची ही नाणी कामगारांनी तत्काळ ग्रामपंचायत व महसूल अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली.

महसूल अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून ही नाणी ताब्यात घेतली असून सवदत्तीचे तहसीलदार मल्लिकार्जुन हेग्गण्णावर यांच्यामार्फत सरकारी तिजोरीत जमा केली आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार ही नाणी दहाव्या ते पंधराव्या शतकातील म्हणजेच पश्चिमेकडील गंग घराणे किंवा विजयनगर साम्राज्याच्या काळातील असावीत. या सोन्याच्या नाण्यांवर हत्तीचे चित्र असून त्यांना ‘गजपती गद्याण’ किंवा ‘गजपती वराह’ म्हटले जाते. या नाण्यांचा नेमका काळ आणि इतिहास जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
कष्टाची कमाई करणाऱ्या या मजुरांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल तालुका प्रशासन आणि ग्रामस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.


Recent Comments