बेळगाव शहरात दरवर्षी अत्यंत थाटामाटात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा अधिक शिस्तबद्ध आणि सुसज्ज वातावरणात पार पाडण्यासाठी बेळगाव महापालिकेने पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली.

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात आवश्यक सर्व पूर्वतयारीची कामे सुरू झाली आहेत. गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना आणि विसर्जनादरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

उत्सवापूर्वी शहरातील विविध विसर्जन तलावांची स्वच्छता आणि आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळांना आणि नागरिकांना विसर्जनासाठी योग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यास महापालिका सज्ज आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळणे सुलभ व्हावे यासाठी ‘एक खिडकी योजना’ राबवण्यात येत आहे. या माध्यमातून सर्व विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील. या प्रक्रियेत शहर पोलीस विभाग प्रमुख भूमिका बजावणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात गर्दी लक्षात घेता रस्ते, वाहतूक आणि विसर्जन स्थळांवर मूलभूत सुविधा पुरवण्यावर भर दिला जात आहे. सर्व गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले.


Recent Comments