Hukkeri

नेत्रदान करून दोघांच्या आयुष्यात प्रकाश आणा: शून्य संपादन मठाचे श्री

Share

नेत्रदान करून अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे कार्य सर्वांनी करावे असे आवाहन यमकनमर्डीच्या शून्य संपादन मठाच्या श्रींनी केले आहे.

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त संकेश्वर येथील एम एम जोशी नेत्र विज्ञान संस्थेच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हुणशीकोळ मठाचे श्री आणि हुक्केरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ उदय कुडची यांनी लक्ष्मी देवी मंदिर परिसरात हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.

संकेश्वर परिसरात एम एम जोशी संस्था दरवर्षी नेत्रदान जनजागृती उपक्रम राबवून गरजूंना मदत करत आहे. मृत्यूनंतर दोन व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी सर्वांनी हयातीतच नेत्रदानाचा संकल्प करावा असे प्रतिपादन शून्य संपादन मठाच्या श्रींनी केले.

या रॅलीत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्स नेत्रदानाचे फलक व घोषणा देत सहभागी झाले होते. गांधी चौक, बाजार रस्ता मार्गे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांनी डोळ्यांचे महत्त्व पटवून देणारे पथनाट्य सादर केले.

दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात राष्ट्रीय उपक्रम म्हणून नेत्रदान जनजागृती मोहीम राबवली जाते. यंदा क्यूआर कोडद्वारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ उदय कुडची यांनी दिली.

या प्रसंगी एम एम जोशी संस्थेच्या अधिकारी संजना पाटील, प्राचार्य कांबळे, डॉ बसवराज कुडची यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

राजू बागलकोटी
इन न्यूज हुक्केरी

Tags: