Belagavi

बेळगाव जिल्ह्यात शिक्षक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

Share

बेळगाव जिल्ह्यात शिक्षक दिनाचे औचित्य साधून भव्य स्वेच्छा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाला नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी संघ, शिक्षक संघ आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने जिल्हाभरात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या मोहिमेत १० हजार युनिट रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून रक्तदान हे जीवन वाचवणारे पुण्यकार्य असल्याने नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे प्रादेशिक आयुक्त के एम जानकी यांनी म्हटले.

जिल्ह्यातील तालुका रुग्णालये, समुदाय आरोग्य केंद्रे आणि नियुक्त २३ केंद्रांवर वैद्यकीय पथकांच्या मदतीने रक्तदानाची सोय करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी १० हजारांपेक्षा जास्त नोंदणी झाली असून सर्व घटकांनी स्वेच्छेने यात सहभाग नोंदवावा अशी प्रतिक्रिया जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली.

या वेळी कडोळी येथील शाळेच्या शिक्षिका महादेवी भट्टीनवर यांनी पहिल्यांदाच रक्तदान करत आनंद व्यक्त केला. रक्तदान हेच सर्वात मोठे दान असून यामुळे अनेकांचे प्राण वाचतात असे महादेवी भट्टीनवर यांनी म्हटले.

या उपक्रमात शिक्षक, शासकीय कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले. समाजोपयोगी उपक्रमांतून शिक्षकांचा सन्मान करण्याची ही परंपरा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे.

Tags: