हुक्केरी शहरात मागासवर्गीय कल्याण विभाग, तालुका प्रशासन आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री स्व. डी. देवराज अरसू यांची जयंती साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार बळराम कट्टीमनी यांनी स्व. डी. देवराज अरसू यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून केले. मागासवर्गीय कल्याण अधिकारी के. बी. देवप्पागोळ यांनी स्वागत करून प्रास्ताविक मांडले.


मुख्य वक्ते म्हणून बोलताना तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लादड म्हणाले, “समतेचे स्वप्न पाहणारे माजी मुख्यमंत्री स्व. डी. देवराज अरसू हे खऱ्या अर्थाने समाजसुधारक होते. कर्नाटकात भूसुधारणा, शिक्षण व नोकरीत आरक्षण, वेठबिगारी निर्मूलन, मैला वाहण्याच्या पद्धतीवर बंदी, निरुद्योगांना विद्यावेतन, अल्पभूधारकांना मोफत वीज आणि किमान वेतन निश्चिती यांसारख्या अनेक क्रांतीकारी योजनांचे जनक म्हणून देवराज अरसू यांचे कार्य अजरामर आहे.”
या प्रसंगी उत्कृष्ट वसतिगृह प्रमुख शबीना मुल्ला, स्वयंपाकी कर्मचारी मालाश्री शेकीनाव्हर आणि शिवू माळगी यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला नगरपालिका मुख्याधिकारी ईश्वर सिद्नाळ, कृषी अधिकारी महादेव पटगुंदी, बी. एस. शिरागांवी, जी. एस. यादवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments