शिवबसवनगर येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात आयोजित एस. जी. बाळेकुंद्री तंत्रनिकेतनच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष बी.ई. आणि बी.सी.ए. च्या नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच पार पडला.


या कार्यक्रमास उपस्थित असलेले नागणूर रुद्राक्ष मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व त्याच्या सभोवतालचे वातावरण, शिक्षक आणि पालक यांच्यावर अवलंबून असते. या सर्वांच्या समन्वयातूनच एका आदर्श व्यक्तीची निर्मिती होते. व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षणासोबत संस्कार अत्यंत आवश्यक असून शिक्षण आणि संस्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मत नागणूर रुद्राक्ष मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजी यांनी व्यक्त केले.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे.पी.एफ. मेटाकास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक गौरव पंडित यांनी, ‘अभियांत्रिकी ही केवळ एक पदवी नसून समाजातील समस्यांवर तोडगा काढण्याची ती एक जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन केले.
हायड्रोपॅक इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक सुधीर दरेकर यांनी, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी निरंतर प्रयत्न, वेळेचे भान, शिस्त आणि संयम ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य विलास बादामी, प्रभाकर नगरमुन्नोळी व सचिव एस. पी. हिरेमठ उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बी. आर. पटगुंदी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राध्यापिका डॉ. अनिता पाटील यांनी सूत्रसंचालन , तर बेसिक सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. अशोक हुलगबाळी यांनी आभार मानले.


Recent Comments