बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे भाजप आमदार अभय पाटील हे भ्रष्टाचार आणि उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती (DA) प्रकरणात अडकले आहेत. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बेळगावातील नागरिकांनी बुधवारी कन्नड साहित्य भवनात धरणे सत्याग्रह केला.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद म्हणाले की, वाल्मिकी महामंडळातील गैरव्यवहारावरून मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आमदार अभय पाटील यांना भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. गेल्या १० वर्षांपासून बेकायदेशीर मालमत्ता हडपल्याचे आणि भ्रष्टाचाराचे गुन्हे त्यांच्यावर दाखल असून हे प्रकरण लोकायुक्त आणि न्यायालयात प्रलंबित आहे.

भाजपने मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यापूर्वी भ्रष्ट आमदार अभय पाटील यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच लवकरच बेळगाव दक्षिण मतदारसंघातून भव्य पादयात्रा काढून लढा उभारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
राजकुमार टोपण्णवर यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, भाजपच्या नेत्यांना काँग्रेस मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. भाजप स्वतःला शिस्तबद्ध पक्ष म्हणवतो, तर मग खाणकाम आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या आमदार अभय पाटील यांचा राजीनामा का घेतला जात नाही? आधी स्वतःच्या भ्रष्ट आमदाराचा राजीनामा घ्या आणि मगच दुसऱ्यांवर आरोप करा, असे थेट आव्हान त्यांनी दिले.
या आंदोलनात अनिल उपरी, युवराज तळवार, सद्दाम तहसीलदार, सिद्धार्थ चव्हाण, सचिन तळवार, सलीम सनदी, आनंद पुजारी, बलराम संगोळी, आसिफ मुल्ला, आशिष पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.


Recent Comments