Dharwad

धारवाडमध्ये भाजपचे तीव्र आंदोलन

Share

वाल्मीकी विकास महामंडळ घोटाळ्यातील आरोपी बी. नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या काँग्रेस सरकार आणि हायकमांडच्या निर्णयाचा निषेध करत, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धारवाडमध्ये भाजपकडून धरणे आंदोलन करण्यात आले.

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी बसलेल्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस हायकमांड तसेच राज्य सरकारच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.

यापूर्वी झालेल्या १८७ कोटी रुपयांच्या वाल्मीकी महामंडळ घोटाळ्यात नाव आल्यानंतर बी. नागेंद्र यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभेत तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले होते. याशिवाय या प्रकरणी नागेंद्र यांना तुरुंगवासही झाला आहे.

असे असताना कोणत्या नैतिकतेच्या आधारावर त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. पैसे देऊन मंत्रिपद मिळवले की कितीही मोठा गैरव्यवहार केला तरी चालतो, असा संदेश काँग्रेस देत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बी. नागेंद्र यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.

Tags: