बेळगाव शहरातील माळमारूती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत गांधीनगर आणि अमीन गल्ली परिसरात गस्त घाजत असताना पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे.

रेहान इस्माईल नदाफ (वय २०, रा. गुळजार गल्ली, गांधीनगर, बेळगाव) असे पकडलेल्या तरुण आरोपीचे नाव आहे. हा तरुण आपल्या दुचाकीवरून विनापरवाना काहीतरी गंभीर अपराध करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

माळमारूती पोलीस ठाण्याचे पीएसआय आनंद आदगोंडा व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान आरोपीकडे एक लोखंडी कुऱ्हाड, एक चाकू आणि एक कोयता अशी एकूण तीन धारदार शस्त्रे सापडली. पोलिसांनी ही शस्त्रे आणि त्याची दुचाकी असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी माळमारूती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या पोलीस पथकाचे शहर पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.


Recent Comments