खानापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी ‘सिंगल विंडो’ (एक खिडकी) पद्धत लागू करण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने केली आहे. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दुंडप्पा कोमार व नगर पंचायत अधिकाऱ्यांना याबाबत स्वतंत्र निवेदन देऊन गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची व स्वच्छता राखण्याची मागणी केली.


खानापूर तालुका सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दुंडप्पा कोमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गणेश मंडळांना नगर पंचायत, हेस्कॉम आणि पोलीस विभागाकडून परवानगी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत मारावे लागणारे फेरे टाळण्यासाठी ‘सिंगल विंडो’ प्रणाली सुरू करावी, असा आग्रह धरण्यात आला. यावर सकारात्मक प्रतिसाद देत तहसीलदार दुंडप्पा कोमार यांनी सिंगल विंडो व्यवस्थेसाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांच्या अनुपस्थितीत महसूल अधिकारी गंगाधर कांबळे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी अधिकारी प्रेमानंद नायक उपस्थित होते.

गणेशोत्सवाची मिरवणूक आणि भाविकांच्या सोयीसाठी शहरातील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत व स्वच्छता राखावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या प्रसंगी महामंडळाचे कार्याध्यक्ष रवी काटगी, प्रकाश देशपांडे, माजी नगरसेवक नारायण ओगले, अनंत सडेकर, राहुल सावंत, सनी मयेकर, संदीप शेंबळे, पुट्या हावणूर, प्रज्योत दलाल, प्रदीप देसाई यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(वार्ताहर: अल्ताफ एम. बसरीकट्टी, इन न्यूज खानापूर)


Recent Comments