Khanapur

अतिरिक्त केएसआरटीसी बस प्रवासासाठी ‘करवे’ आक्रमक

Share

खानापूर तालुक्यातील विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गांवर अतिरिक्त बस सेवा सुरू करण्याची मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या (करवे) पदाधिकाऱ्यांनी केएसआरटीसी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले.

तालुक्यातील अनेक गावांतून शहरी भागात वेळेवर बस येत नसल्याने आणि प्रवाशांची गर्दी वाढल्याने विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर करवे तालुका अध्यक्ष विठ्ठल हिंडलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

व्यवस्थापकांच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारले. या समस्येवर तात्काळ तोडगा काढून मुख्य मार्गांवर अतिरिक्त बस फेऱ्या सुरू न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा करवे नेत्यांनी दिला आहे.

या शिष्टमंडळात संजय कारकद, रवी मादिगर, मदिवाळी भूपन्नी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: