बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कन्नड आणि संस्कृती विभाग तसेच महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने १२ व्या शतकातील महान शिवशरण हडपद अप्पण्णा यांच्या ८९२ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.


जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कन्नड आणि संस्कृती विभाग तसेच महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्य कार्यक्रमात मान्यवरांनी शिवशरण हडपद अप्पण्णा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.


महापौर प्रीती कामकर यांनी बसवण्णा आणि बसवादी शरण यांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले. ‘कायकवे कैलास’ या तत्त्वानुसार समता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य जपत समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे प्रीती कामकर यांनी सांगितले.

उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी शिवशरण हडपद अप्पण्णा यांनी ज्ञानदासोह आणि कायकाच्या माध्यमातून समाजाला दिलेल्या योगदानाचा गौरव केला. व्यवसायाच्या आधारावर भेदभाव न करता समतेच्या तत्त्वावर समाज उभा राहिल्यासच शरणांच्या विचारांचा खरा सन्मान होईल, असे हनुमंत कोंगाळी यांनी नमूद केले.

व्याख्याते संतोष हडपद यांनी शिवशरण हडपद अप्पण्णा यांच्या कार्याचा आढावा घेत समाजाच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज व्यक्त केली. समाजाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण समाजाला काय देतो, या भावनेतून कार्य केल्यास आदर्श समाजाची निर्मिती शक्य असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमात समाजबांधवांसोबत एका माकडानेही उपस्थिती लावत खुर्चीवर बसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात ही अनोखी उपस्थिती पाहून अनेकांनी त्याची उत्सुकतेने चर्चा केली.
कार्यक्रमापूर्वी शहरातील अशोक चौक, आरटीओ, संगोळी रायण्णा चौक आणि एसपी कार्यालय मार्गे कुमार गंधर्व कलामंदिरापर्यंत शिवशरण हडपद अप्पण्णा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत समाजबांधव, मान्यवर आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध लोककला पथकांच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र बेळगाव शहरात दिसून आले.


Recent Comments