प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांसाठीचा पुढील हप्ता वर्षभरानंतरही न मिळाल्याने निपाणी तालुक्यातील भोज येथील लाभार्थ्यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी केली.

निपाणी तालुक्यातील भोज गावात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मंजूर झाली असली, तरी गेल्या वर्षभरापासून पुढील अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची घरे अर्धवट अवस्थेत आहेत. या प्रकरणी प्रभावती अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

गावातील १० ते १५ कुटुंबांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचे अनुदान मंजूर असून सुरुवातीला पाया बांधकामासाठी केवळ ३० हजार रुपये देण्यात आले. त्यानंतरचा हप्ता न मिळाल्याने घरांची कामे रखडली असून ग्रामपंचायतीकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
अर्धवट घरे पावसामुळे खराब होत असून जुनी घरे पाडल्यानंतर नवीन घरे पूर्ण करता आली नसल्याने अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रखडलेला निधी तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.


Recent Comments