कित्तूर मतदारसंघातील एम. के. हुबळी आणि संपगावला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या कामाला ३.५० कोटी रुपये खर्चातून सुरुवात झाली असून आमदारांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.

एम. के. हुबळी आणि संपगाव दरम्यान योग्य पूल नसल्याने शेतकरी आणि नागरिकांना सतत अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन आमदार बाबासाहेब पाटील यांनी विशेष निधी मंजूर करून घेऊन कामाचा प्रारंभ केला. या प्रसंगी बोलताना त्यांनी रस्त्यालगतच्या ऐतिहासिक तलावाच्या विकासासाठी २ कोटी रुपयांचा निधी देण्यासह इटगी रस्त्याचे कामही लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य नेत्याला मंत्रीपद देण्याची मागणी वरिष्ठांकडे केल्याचे त्यांनी नमूद केले.

रखडलेल्या तलावाच्या कामाला गती देत नव्या पुलासाठी निधी आणल्याबद्दल स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी आमदारांचे आभार मानले. सुरू झालेली ही कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन तलावात पाणी साचल्यास परिसरातील अनेक गावांतील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.



Recent Comments