Uncategorized

जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त केएलई संस्थेची जनजागृती मोहीम हिपॅटायटिस बी आणि यकृत प्रत्यारोपणाबाबत नागरिकांना मार्गदर्शन

Share

जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त बेळगाव येथील केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि जेएन वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने हिपॅटायटिस बी व अवयवदानाबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली.

डॉ. प्रभाकर कोरे यांच्याहस्ते फेरीला सुरुवात झाल्यानंतर डॉ. प्रभाकर कोरे यांनी अवयवदान आणि आरोग्यविषयक जनजागृतीची गरज व्यक्त केली. मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक वैद्यकीय सुविधा बेळगावमध्येही कमी खर्चात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

डीसीपी नारायण भरमणी यांनी केएलई रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा आणि दर्जेदार उपचार व्यवस्थेचे कौतुक केले. रुग्णांना चांगली सेवा आणि काळजीपूर्वक उपचार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. संतोष हजारे यांनी हिपॅटायटिस बी आणि सीमुळे होणाऱ्या यकृताच्या आजारांबाबत माहिती दिली. वेळेवर तपासणी, लसीकरण आणि उपचारांमुळे धोका कमी करता येतो, असे त्यांनी सांगितले. गेल्या १४ वर्षांत लाखो नागरिकांची तपासणी करून अनेकांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केएलई रुग्णालयात यकृताच्या आजारांवर उपचार तसेच यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध असून, आतापर्यंत सुमारे २८ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केएलई नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिपॅटायटिस संसर्गाबाबत जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. चन्नम्मा चौकातून सुरू झालेली जनजागृती फेरी केएलई रुग्णालयात पोहोचली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर आणि अधिकारी उपस्थित होते.

Tags: