बेळगावमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय अहिंद नेत्यांच्या बैठकीत मंत्री डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच अहिंद समाजाचे नेतृत्व स्वीकारून ही चळवळ अधिक मजबूत करावी, अशी मागणी नेत्यांनी एकमुखाने केली.

बेळगाव शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी अहिंद संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसह समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीला संबोधित करताना बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी राज्यभर अहिंद संघटनेचा विस्तार करण्यासाठी काम केल्याचे सांगितले. बीदरपासून चामराजनगरपर्यंत संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच युवा नेतृत्वाला पुढे आणण्याच्या माध्यमातून नव्या पिढीला संघटनेशी जोडण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नेत्यांनी डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून अहिंद समाजातील मागास, दलित आणि अल्पसंख्याक घटकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी मागणी केली. कोणत्याही अपेक्षेशिवाय मोठ्या संख्येने लोक बैठकीला उपस्थित राहिले असून, त्यांच्या विश्वासाला न्याय देत अहिंद संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.
आगामी काळात अहिंद समाजातील व्यक्ती राज्याच्या नेतृत्वाच्या पदावर पोहोचण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न वाढवावेत, अशी अपेक्षाही बैठकीत व्यक्त करण्यात आली.
या बैठकीला आमदार विश्वास वैद्य, डीसीसी बँक संचालक राहुल जारकीहोळी यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.


Recent Comments