बेळगाव महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील. इ-खाता आणि इतर नागरी सेवांमध्ये मध्यस्थ व एजंटांना हस्तक्षेप करण्याची संधी दिली जाणार नाही, असे नगरविकास मंत्री डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

बेळगाव काँग्रेस भवन येथे माध्यमांशी बोलताना यतींद्र सिद्धरामय्या यांनी सांगितले की, नागरिकांना नागरी सेवा थेट आणि सुलभ पद्धतीने मिळाव्यात यासाठी प्रशासनात बदल करण्यात येतील. कागदपत्रे तयार करून देण्याच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या मध्यस्थांच्या गैरप्रकारांना पूर्णपणे आळा घालण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कावेरी पाणीवाटपाच्या प्रश्नावर आपण स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबतचा अंतिम निर्णय सरकार आणि संबंधित प्राधिकरणांच्या माध्यमातून घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव शहरातील रखडलेल्या रस्ते कामांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. रस्ते खोदून कामे अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदार आणि खासगी कंपन्यांना कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विलंबामुळे नागरिकांना त्रास होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे यतींद्र सिद्धरामय्या यांनी सांगितले.
बेळगाव शहरातील अनेक घरांच्या कागदपत्रांबाबत समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर कायदेतज्ज्ञांचे मत घेऊन नियमांच्या चौकटीत तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शहर स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे तसेच अशोकनगर जलतरण तलावाचे आधुनिक सुविधांसह नूतनीकरण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावमध्ये होणाऱ्या अहिंद नेत्यांच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचे यतींद्र सिद्धरामय्या यांनी सांगितले. केवळ नावापुरते नव्हे तर जनतेसाठी काम करणारेच खरे अहिंद नेते असतात, असे त्यांनी नमूद केले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत आपण वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे यतींद्र सिद्धरामय्या यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या निवडणूक लढवणार नसले तरी राजकारणात सक्रिय राहतील. ते राष्ट्रीय राजकारणात जाणार नसून राज्याच्या राजकारणातच मार्गदर्शन करत राहतील, असे यतींद्र सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा हमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नावलगी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments