Hukkeri

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथे लक्ष्मी देवी यात्रा समितीच्या बैठकीत गोंधळ

Share

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात आयोजित श्री लक्ष्मी देवी यात्रा समितीच्या पूर्वतयारी बैठक प्रसंगी मागील यात्रेच्या हिशोबावरून दोन गटांमध्ये तीव्र वाद झाल्याची घटना घडली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत वाद मिटवला.

संकेश्वर येथील श्री लक्ष्मी देवी समुदाय भवनात यात्रा समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी यांच्या अध्यक्षतेखाली विविध समाजाचे नेते आणि समिती सदस्यांची पूर्वतयारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मागील यात्रेचा हिशोब योग्य पद्धतीने देण्यात आलेला नाही आणि काही पावती पुस्तके गहाळ झाल्यामुळे निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप सुनील पर्वतराव, नंदू मुडसी, गजानन कोळी आणि रोहन नेसरी आदींनी केला.

त्यानंतर यात्रा समितीचे सचिव बसगौडा पाटील यांनी हिशोबाची आकडेवारी मांडत सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचे सांगितले. मात्र, दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये वाद वाढल्याने बैठकस्थळी गोंधळ निर्माण झाला. अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी यांनी हिशोबात कोणतीही त्रुटी नसल्याचे स्पष्ट केले, तरीही नेत्यांमधील शाब्दिक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक गणपती कोगनळ्ळी आणि उपनिरीक्षक विठ्ठल नाईक यांनी मध्यस्थी करत सर्वांची समजूत काढली. यानंतर अमर नलवडे यांनी, केवळ समितीत स्थान मिळवण्यासाठी काही जण बिनबुडाचे आरोप करत असल्याचे सांगितले.

शेवटी पंच समितीचे सदस्य कुणाल पाटील यांनी, शहरातील सर्व समाजाच्या नेत्यांना सोबत घेऊन यात्रा शांततेत पार पाडली जाईल आणि मंगळवारी धार्मिक विधी करून यात्रेला प्रारंभ केला जाईल, असे स्पष्ट करत बैठक संपवली. या बैठकीला संजय शिरकोळी, श्रीकांत हतनुरे, शंकरराव हेगडे, पवन कणगले, अजित करजगी, अविनाश नलवडे, विजय जरळी, संतोष मुडसी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, यात्रेच्या निमित्ताने नेत्यांमध्ये पडलेल्या दोन गटांमुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

राजू बागलकोटी
इन न्यूज, हुक्केरी.

Tags: