पूर्ववैमनस्याच्या कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणाजवळ ही घटना घडली. पास्कल हृदय राज मुत्तुस्वामी (३१) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गोकाक तालुक्यातील माणिकवाडी गावाचा रहिवासी होता.

मृत पास्कल हा आपल्या मित्रांसह हिडकल धरणाजवळ गेला असताना, पूर्ववैमनस्याचा वचपा काढण्यासाठी सुमारे ११ जणांच्या टोळीने धारदार शस्त्रांसह त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पास्कलचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या गुन्ह्यात गंगप्पा नाईक, राहुल, नागेश नाईक, प्रज्वल यांच्यासह इतरांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, आतापर्यंत ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हत्येचा मुख्य हेतू आणि कटाचा सखोल तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.


Recent Comments