Khanapur

गर्लगुंजीत अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी

Share

खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी या मोठ्या गावांपैकी एका गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री त्वरित बंद करावी, या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाला संयुक्त निवेदन देण्यात आले.

गर्लगुंजी ग्राम विकास समिती आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामगोंडा बसरगी यांची भेट घेऊन गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याची मागणी केली. गावात वाढत्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून, मद्यपींमुळे महिला, मुले आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शाळेच्या आवारात दारू पिऊन बाटल्या फोडल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गर्लगुंजी-नंदीहल्ली रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालणे, महिलांशी गैरवर्तन करणे आणि शेतशिवारात रिकाम्या बाटल्या फेकण्याचे प्रकार वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांनी या भागात नियमित गस्त घालून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य पानाडूंग सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत मेळगे, परशराम चौगुले, अजित पाटील, प्रसाद पाटील, सुरेश मेळगे, बजरंग दलाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर, पी.के.पी.एस अध्यक्ष संजय पाटील, माजी अध्यक्ष राजू सिद्धाणी, संचालक शांताराम मेलगे, विनोद कुंभार, शिवाजी कोलकार, गंगाराम वड्डेबैलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: