मुंबईत नुकत्याच झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हालचालींना वेग आला आहे. खानापूर येथील शिवस्मारकात झालेल्या प्रमुख बैठकीत, सीमा प्रश्न सोडवणे हेच आमचे अंतिम ध्येय असल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

मुंबईत ८ जुलै रोजी झालेल्या बैठकीमुळे सीमाप्रश्नाच्या कायदेशीर लढ्याला नवी गती मिळाली असल्याचे खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सांगितले. खानापूर येथील महत्त्वपूर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागात मराठी भाषिकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात सीमावादाच्या खटल्यासाठी अतिरिक्त ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करणे, केंद्राशी समन्वय साधणे आणि कोल्हापुरात दरमहा समन्वय मंत्र्यांची बैठक घेणे या मुंबईतील निर्णयांचे त्यांनी स्वागत केले. आगामी स्थानिक निवडणुकांसह मतदार यादी पुनरीक्षणावर या बैठकीत चर्चा झाली. या प्रसंगी कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, धनंजय पाटील, प्रकाश चव्हाण आणि रमेश धबाले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments