Khanapur

खानापुरात मुसळधार पावसामुळे रस्ता खचला; दहा गावांचा संपर्क तुटण्याची भीती

Share

खानापूर तालुक्यातील मडवाळ-हलशी रस्त्यावरील नाल्यालगतचा भाग मुसळधार पावसामुळे खचला असून वाहतुकीसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. आगामी काळात पाऊस वाढल्यास या भागातील प्रमुख १० गावांचा संपर्क पूर्णपणे तुटण्याची भीती निर्माण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कायमस्वरूपी काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

खानापूर तालुक्यातील मडवाळ-हलशी रस्त्यावरील नाल्याजवळील भाग नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खचला आहे, ज्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षीही या रस्त्याचा एकतर्फी भाग खचला होता, तर यावर्षी दुसऱ्या बाजूचा भाग खचत चालल्याने मडवाळ, हलशी, देवराई, घोटगाळी, रेडेकुंडी, तारवाड, रंजनकोडी, शिवठाण यासह सुमारे दहा गावांचा संपर्क पूर्णपणे तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढत असून रस्ता अरुंद झाल्याने कोणत्याही क्षणी वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब देसाई, महादेव फटाण यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच या रस्त्याचे रुंदीकरण करून येथे कायमस्वरूपी पक्का रस्ता तयार करून द्यावा, असा आग्रह स्थानिक ग्रामस्थांनी धरला आहे.

Tags: