Khanapur

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज; आम. हलगेकर

Share

जागतिक तापमानवाढीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी खानापूर तालुक्यातील कसबा नंदगड येथे महत्त्वपूर्ण पर्यावरण जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेल्या “प्रत्येक भाविकाकडून एक वृक्ष” या महाअभियानाचा शुभारंभ स्थानिक आमदारांच्या हस्ते करण्यात आला.

जगद्गुरु श्रीमद रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराज (नाणीजधाम) यांच्या दिव्य प्रेरणेने तालुक्यातील कसबा नंदगड गावात ‘वृक्षारोपण महाअभियान २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी स्वतः रोपटे लावून या अभियानाचा अधिकृत शुभारंभ केला. यावेळी बोलताना, “प्रत्येक भाविकाकडून एक वृक्ष” या संकल्पांतर्गत वृक्षारोपण करण्याचे भाग्य लाभणे हे माझे सुदैव असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जागतिक तापमानवाढीसारख्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी संप्रदायाच्या वतीने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आणि काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ शिक्षक बाळकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या प्रसंगी विलास पाटील, गजानन पाटील, गोपाळ पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह जगद्गुरु नरेंद्र स्वामीजींचे स्थानिक भाविक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून पर्यावरण संरक्षणाचा दृढ संकल्प केला.
– अल्ताफ एम. बसरीकट्टी, इन न्यूज खानापूर

Tags: