येळ्ळूर रोडवर बस थांबत नसल्याने शेतकरी महिलांची मोठी गैरसोय होत होती.गावातील मान्यवर आणि शेतकऱ्यांनी हि बाजू उचलून धरल्याने आज केएसआरटीसी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, उद्यापासून सर्व थांब्यांवर बस थांबवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.


गेल्या काही दिवसांपासून वडगाव, शहापूर, अनगोळ, देसूर, राजहंसगड अशा विविध भागांतून येळ्ळूर शिवारात शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या महिलांना बस चालकांकडून डावलले जात होते. अधिकृत थांबे असूनही चालक बस न थांबवता पुढे जात असल्याच्या तक्रारी नागरिक आणि शेतकरी नेत्यांनी केल्या होत्या. प्रवाशांच्या या समस्येची दखल घेत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासमवेत गावातील नागरिक आणि शेतकरी महिलांनी आज केएसआरटीसी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन येळ्ळूर वडगाव परिसरातील बस थांब्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी अधिकृत बस स्टॉपचे फलक असलेले सर्व मार्ग आणि जागा अधिकाऱ्यांना दाखवण्यात आल्या.


खरीप हंगामात शेतातील कामावरून परतताना बसमध्ये पुरेशी जागा असतानाही महिलांना न घेता बस पुढे निघून जात असल्यामुळे महिलांना संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाट पाहावी लागत होती. गेल्या वर्षी याच हंगामात बायपासजवळ बसमध्ये चढत असताना एका महिलेचा अपघातही झाला होता. या पार्श्वभूमीवर, सतीश पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे शेतकरी महिलांची अडचण मांडून सर्व थांब्यांवर चालकांनी बस थांबवणे बंधनकारक करण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांनी या समस्येची गंभीर दखल घेत उद्यापासून सर्व नियुक्त थांब्यांवर बसेस थांबवल्या जातील आणि लोकांचा त्रास दूर केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
या संदर्भात बोलताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले की, शेतकरी महिला आणि प्रवाशांना दररोज होणारा मनस्ताप सहन करण्यापलीकडे गेला होता. आम्ही प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला होता की, जर अधिकृत थांब्यांवर बस थांबवली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. आज अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून उद्यापासून बस थांबवण्याचे मान्य केले आहे, त्यामुळे हा प्रश्न सुटला असून महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया सतीश पाटील यांनी दिली.


Recent Comments