Uncategorized

जी. ए. हायस्कूलमध्ये शालेय महासंघाचे शानदार उद्घाटन

Share

बेळगाव येथील केएलई संस्थेच्या गिलगिंची अरताळ (जी. ए.) हायस्कूलमध्ये चालू शैक्षणिक वर्षाच्या शालेय महासंघ आणि विविध संघटनांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावेत आणि आई-वडिलांचा सन्मान करावा, असे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी जीवनात मोठी कामगिरी करण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावायला हवी. त्याचबरोबर ज्येष्ठांबद्दल प्रेम आणि आदर बाळगला पाहिजे, असा सल्ला जिल्हा अतिथी व्याख्याता संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अडीवेप्पा इटगी यांनी दिला. ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

आजच्या जगात माणसाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. आपण पाळीव प्राण्यांवर जितके प्रेम करतो, तितके प्रेम जन्म देणाऱ्या माता-पित्यांना देत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मानवी जीवन सर्वश्रेष्ठ असून विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे आणि पालकांच्या अपेक्षेला पात्र ठरावे, असे डॉ. अडीवेप्पा इटगी यांनी म्हटले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना उपप्राचार्य सी. पी. देवऋषी यांनी, या शाळेने विद्यार्थ्यांना नेहमीच उत्तम संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे सांगितले. या विद्यालयातून शिकलेले लाखो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत मोठी कामगिरी करत समाजासाठी योगदान देत आहेत. सध्याच्या विद्यार्थ्यांनीही हाच वारसा पुढे चालवावा, अशी प्रतिक्रिया सी. पी. देवऋषी यांनी दिली.

या कार्यक्रमादरम्यान पृथ्वीराज कोंगाळी आणि कावेरी राठोड यांनी बहारदार भरतनाट्यम नृत्य सादर केले. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना तर नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. सी. एम. पागाद यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर एस. जे. येळूकोटी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आर. एस. मळकूर यांनी महासंघाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. हळवाई आणि एस. बी. कोरे यांनी संयुक्तपणे केले, तर एम. एस. मगदूम यांनी आभार मानले. व्यासपीठावर विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य तेवरे आणि सुश्मिता बेडसूर उपस्थित होते.

Tags: