पणजी-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील लोंढा ते संगरगाळी दरम्यानच्या सर्व्हिस रस्त्याची दुरवस्था झाली असून कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


पावसामुळे गुंजी गाव ते संगरगाळी दरम्यानच्या सर्व्हिस रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. संबंधित विभागाच्या कंत्राटदाराने हे खड्डे खडीऐवजी केवळ मातीने बुजवल्यामुळे आता या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलामुळे लोंढा-खानापूर मार्गावरील परिवहन महामंडळाच्या बस आणि मालवाहू ट्रक चिखलात अडकण्याची भीती निर्माण झाली असून चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्यास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर संतप्त प्रतिक्रिया देताना वाहनधारकांनी “चिखलापेक्षा खड्डे बरे होते” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. कंत्राटदाराने केवळ माती टाकणे बंद करून तातडीने दगड आणि खडीचा वापर करून खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत आणि वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.


Recent Comments