बळ्ळारी येथील गुग्गरट्टी भागात कौटुंबिक वादातून आणि चारित्र्याच्या संशयावरून बाप-लेकाने मिळून पत्नी आणि सासऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर आयजीपी हर्ष आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

तेजा आणि त्याचे वडील गुरुशंकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तेजा याने कौटुंबिक कलह आणि पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून वडील गुरुशंकर याच्या मदतीने पत्नी नागलक्ष्मी आणि सासरे श्रीनिवास यांच्यावर घरासमोरच हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला असून, घटनेनंतर आरोपी पळून न जाता मृतदेहाजवळच थांबून होते.

या घटनेची माहिती मिळताच आयजीपी हर्ष यांनी घटनास्थळी भेट दिली. पत्नीच्या वर्तनावरील संशय आणि त्यातून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती आयजीपी हर्ष यांनी दिली. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाने पुरावे गोळा केले असून, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत.


Recent Comments