Uncategorized

आम. आसिफ सेठ यांच्याकडून स्कूबा डायव्हिंग किट भेट

Share

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफसेठ आणि युवा नेते अमान सेठ यांनी ‘आसिफ राजू सेठ फाउंडेशन’च्या वतीने स्थानिक रेस्क्यू टीमला २.५ लाख रुपयांचे व्यावसायिक स्कूबा डायव्हिंग किट सुपूर्द केले आहे.

 

काही महिन्यांपूर्वी कपिलेश्वर मंदिर परिसरात घडलेल्या एका दुर्घटनेनंतर, आमदार आसिफ सेठ यांनी बचाव पथकाच्या जवानांशी चर्चा केली होती. त्यावेळी खोल पाण्यात शोध घेण्यासाठी टीमकडे पुरेशी आणि आधुनिक उपकरणे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. जवानांच्या जिवाचा धोका आणि आधुनिक सुरक्षा साधनांचे महत्त्व लक्षात घेऊन आमदारांनी त्यांना आवश्यक किट देण्याचे आश्वासन दिले होते.

तोच शब्द पाळत आमदार आसिफ सेठ आणि अमान सेठ यांनी हे अडीच लाखांचे आधुनिक स्कूबा डायव्हिंग किट टीमकडे सुपूर्द केले. या उपकरणांमुळे पूर परिस्थिती किंवा पाण्यात बुडणाऱ्यांचा शोध घेताना रेस्क्यू टीमची कार्यक्षमता आणि सुरक्षा कमालीची वाढणार आहे.

या प्रसंगी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी, बचाव पथकातील जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत असल्याने त्यांना सर्वोत्तम दर्जाची उपकरणे मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. आपत्ती व्यवस्थापन मजबूत करणे आणि फ्रंटलाईन टीमला पाठबळ देणे ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार आसिफ सेठ, अमान सेठ आणि फाउंडेशनने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले. या नवीन उपकरणांमुळे आमच्या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असा विश्वास टीमने व्यक्त केला.

Tags: