बेळगाव शहरातील विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन, लाडके क्रिकेटपटू एम. एस. धोनी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगावात आमंत्रित करावे, अशी अनोखी मागणी केली. यासोबतच विद्यार्थ्यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या गंभीर समस्येकडेही जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.


विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन धोनी यांना बेळगावात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची विनंती केली. तसेच, गेल्या १५ दिवसांत पूर आणि आपत्ती व्यवस्थापनात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे आभार मानत, मुलांना कृत्यज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांना आंब्याचे रोपटे भेट दिले.

केवळ कौतुक करून न थांबता, विद्यार्थ्यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांची ही सामाजिक जाणीव पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी सुरू असलेल्या उपायांची माहिती देत, त्यांनी या विषयावरील पुढील अधिकृत बैठकीसाठी विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रण दिले. तसेच धोनी यांना बेळगावात आणण्यासाठी प्रांजळ प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीचे नेतृत्व देविका खानमुकर यांनी केले. त्यांच्यासोबत शिवतेज खन्नूकर, अहल्या होसूरकर, अर्जुन होसूरकर, सार्थक साईनेकर, वैभवी साईनेकर, शंतनू खानमुकर, शर्वरी खन्नूकर, अथर्व संतोष पवार, अदिती साळुंके, अनन्या साळुंके, स्वराज खानमुकर, रुदिता पवार आणि स्वयं पवार हे विद्यार्थी उपस्थित होते. तरुण पिढी सामाजिक हितासाठी थेट प्रशासनाशी संवाद साधत असल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी मुलांच्या उत्साहाची प्रशंसा केली.


Recent Comments