Uncategorized

बेळगावात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थितीची शक्यता : यंत्रणांना हाय अलर्ट!

Share

बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्व यंत्रणांनी हाय अलर्टवर राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत

महाराष्ट्र आणि बेळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व शासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा विपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ते बोलत होते.

नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून बोटींची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एसडीआरएफ आणि अग्निशामक दलाला चोवीस तास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागातील कोसळलेले विजेचे खांब, रोहित्र आणि वीजवाहिन्यांची दुरुस्ती तातडीने हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील कमकुवत व पडक्या घरांचे सर्वेक्षण करून, पावसाचा जोर वाढल्यास रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सांगण्यात आले आहे. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही याची काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर होणाऱ्या अतिवृष्टीमुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आणि तेथील प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी बेळगावच्या एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

पावसामुळे उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती करावी, पूरग्रस्त भागात औषधांचा पुरेसा साठा ठेवावा आणि दूषित पाण्याचे स्त्रोत त्वरित बंद करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.

संभाव्य पूर परिस्थितीत बचावासाठी जिल्ह्यात एसडीआरएफच्या ५, अग्निशामक दलाच्या ९ आणि विविध तालुक्यांमध्ये २७ अशा एकूण ४१ बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांसाठी ३९७ मदत केंद्रे आणि जनावरांसाठी १२९ छावण्यांची जागा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

या बैठकीला पोलीस आयुक्त भोरसे गुलाबराव भूषण, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: