Uncategorized

मुसळधार पावसामुळे हालात्री नाला ओसंडून वाहू लागला; ३० गावांचा संपर्क तुटण्याची भीती

Share

पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मनतूर्गा गावाबाहेरून वाहणारा हालात्री नाला पूर्णपणे भरून वाहत आहे. यामुळे खानापूर शहराला जोडणाऱ्या सुमारे ३० गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

पाणलोट आणि पश्चिम घाट परिसरात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने हालात्री नाला धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. सद्यस्थितीत या नाल्यावरील जुना पूल कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा पूल बुडाल्यास खानापूर शहराशी संपर्क असणाऱ्या ३० हून अधिक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटणार असून तिथले जनजीवन विस्कळीत होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने ग्रामस्थांना भीतीच्या सावटाखाली राहावे लागत आहे.

हालात्री नाल्यावरील पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधावा, अशी मागणी स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या पुलाची दुरूस्ती झालेली नाही. या बेजबाबदारपणामुळे दरवर्षी शालेय मुले, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Tags: