बेळगाव दक्षिण मतदारसंघात बीएलओ अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणून त्यांना धमकावले जात असल्याचा निषेध करत, आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आमदार अभय पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार बीएलओ अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन अर्ज वाटप करणे, ते भरून घेणे आणि दररोज २० अर्ज गोळा करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. मात्र, काही पक्षांचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांच्या कामाबाबत संभ्रम निर्माण करत असून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगाव दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डमध्ये हेल्पलाईन केंद्रे सुरू करण्यात आली असून नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या कामाबाबत काही शंका किंवा संभ्रम असल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तो सोडवला पाहिजे. मात्र ते सोडून जर कोणी बीएलओ कर्मचाऱ्यांना धमकावून कामात अडथळा आणत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. यापुढे अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्यांवर किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार अभय पाटील यांनी दिला आहे.


Recent Comments