महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाट परिसर आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीत सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

महाराष्ट्रातील धरणे आणि पावसाच्या पाण्यातून कृष्णा नदीत आज १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग नोंदवला गेला आहे. परिणामी, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत आज एकाच दिवसात तब्बल ४ फुटांची वाढ झाली असून पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत आहे.

नदीची पातळी अचानक वाढल्याने बेळगाव जिल्ह्यातील सीमाभागातील तालुक्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. काही लहान पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा परस्परांशी असणारा रस्ता संपर्क तुटला आहे, त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. पाण्याचा प्रवाह असाच सुरू राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक तालुका प्रशासन आणि पोलिसांनी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे व नदीपात्रात न उतरण्याचे कडक निर्देश दिले आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने कडक देखरेख सुरू ठेवली आहे.


Recent Comments