हावेरी जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन पुढील तीन दिवस ढगांवर प्रक्रिया करून कृत्रिम पाऊस (क्लाउड सीडिंग) पाडण्याचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. हुबळी विमानतळावर या प्रकल्पाचा अधिकृत प्रारंभ केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


उत्तर कर्नाटक भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. पावसाच्या या तुटीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, संबंधित भागातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.


हावेरी जिल्ह्याप्रमाणेच उत्तर कर्नाटकातील इतर टंचाईग्रस्त जिल्ह्यांमध्येही कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन संपूर्ण उत्तर कर्नाटक भागात हा प्रकल्प राबवण्याबाबत अधिकृत विनंती करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांचे संकट दूर करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे आमदार एच. के. पाटील यांनी सांगितले. यापूर्वी २००१ आणि २०१७ मध्ये राज्यात करण्यात आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी ठरला होता, त्याच धर्तीवर यंदाही शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन प्रसंगी आमदार रुद्रप्पा लमाणी, यासीर खान पठाण, एफ. एच. जक्कप्पनवर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments