Belagavi

ब्रिटिशकालीन ऐतिहासिक इमारत नामशेषाच्या उंबरठ्यावर

Share

ब्रिटिश राजवटीविरोधातील लढ्यात क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांनी इंग्रजांचे दफ्तर ज्या इमारतीत जाळून खाक केले होते, ती संपगाव (ता. बैलहोंगल) येथील ऐतिहासिक शासकीय इमारत आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नामशेषाच्या उंबरठ्यावर आहे.

इतिहासकालीन साक्ष देणाऱ्या या मूळ स्मारकाचे सरकारने तातडीने संवर्धन करावे, अशी मागणी ‘न्यायवेम्ब बेळकु’ संस्थेने केली आहे. बेळगाव-बैलहोंगल मुख्य रस्त्यावरील संपगाव गावाच्या मध्यभागी असलेली ही ब्रिटिशकालीन मुख्य कचेरी आणि संगोळी रायण्णा यांना ज्या ठिकाणी बंदी बनवून ठेवण्यात आले होते, ती कारागृहाची इमारत सध्या अत्यंत जर्जर अवस्थेत असून ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. रायण्णा यांचा इतिहास जपण्यासाठी संगोळी आणि नंदगड गावांमध्ये कृत्रिम स्मारके उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने या खऱ्या ऐतिहासिक वास्तूचा विसर पाडला आहे, अशी खंत ‘न्यायवेम्ब बेळकु’ संस्थेचे अध्यक्ष तथा विधिज्ञ सुनील साणीकोप्प यांनी व्यक्त केली.

नव्या पिढीमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करू शकणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूचे तातडीने पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी जयशंकराय्या एस. सुंकदमठ, सोमशेखर कत्ती, अमोघ, आदर्श यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: