निपाणी तालुक्यातील कोनूर-बेनाडी रस्त्यावरील कोरे पोल्ट्री फार्मजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका ६५ वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

कोनूर गावचे रहिवासी महावीर अप्पासो मगदुम असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. महावीर हे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या कामासाठी कोनूरहून बेनाडीकडे दुचाकीवरून जात होते. दरम्यान, कोरे पोल्ट्री फार्मजवळ येताच एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात महावीर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने निपाणी येथून सिद्धगिरी आणि पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते, मात्र दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

अपघात केल्यानंतर संबंधित चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. मृत महावीर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
या घटनेप्रकरणी मृत व्यक्तीचा मुलगा उमेश मगदुम याने दिलेल्या तक्रारीवरून निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन आणि त्याच्या चालकाविरुद्ध ‘हिट अँड रन’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी यांनी अपघातस्थळाला भेट देऊन पाहणी केली असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.


Recent Comments